स्वातंत्र्याच्या ८०व्या वर्षातही जळगावचा प्रभाग क्र. ९ अंधारात; प्रशासनाचा निष्काळजीपणा नागरिकांच्या सुरक्षेवर बेतला
वारंवार तक्रारी करूनही कार्यवाही नाही; स्वातंत्र्यदिनापूर्वी सर्व स्ट्रीट लाईट सुरू करण्याची डॉ. संदीप पाटील यांची मागणी
जळगाव | प्रतिनिधी-
देश १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा ८०वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्याच्या तयारीत असताना जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक ९ मधील सुमारे निम्मे स्ट्रीट लाईट आजही बंद असल्याचे वास्तव समोर आले आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही महानगरपालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ. संदीप पाटील यांनी केला आहे.
त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनाच्या उदासीन कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
डॉ. पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनानुसार, स्ट्रीट लाईटच्या तक्रारींसाठी नागरिकांना वेगवेगळ्या विभागांचे वेगवेगळे संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत. परिणामी तक्रार नेमकी कुठे करायची, कोण जबाबदार आहे आणि कार्यवाही कोण करणार, याचा गोंधळ निर्माण होत असून जबाबदारी झटकण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
महानगरपालिकेच्या टोल-फ्री क्रमांक १८०० २३३ ००१५ वर १५ जुलै रोजी तक्रार क्रमांक ६ आणि ५ ऑगस्ट रोजी तक्रार क्रमांक २ नोंदविण्यात आला. तसेच २८ जुलै रोजी तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न करूनही ती स्वीकारण्यात आली नसल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय विद्युत विभागाचा दूरध्वनी क्रमांक ०२५७-२२२२२७४ वर अनेकदा संपर्क साधूनही प्रतिसाद मिळत नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
“स्वातंत्र्याच्या ८० वर्षांनंतरही नागरिकांना स्ट्रीट लाईट, गटारी आणि इतर मूलभूत सुविधांसाठी वारंवार प्रशासनाचे उंबरठे झिजवावे लागत असतील, तर ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. स्ट्रीट लाईट ही चैनीची सुविधा नसून नागरिकांच्या जीवित आणि सुरक्षिततेशी थेट संबंधित मूलभूत गरज आहे,” असे डॉ. संदीप पाटील यांनी म्हटले आहे.
नागरिकांच्या वारंवार तक्रारींकडे दुर्लक्ष होत असेल, तर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या माध्यमातून हा प्रश्न जनतेसमोर मांडण्याशिवाय पर्याय उरत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्वातंत्र्यदिनापूर्वी प्रभाग क्रमांक ९ मधील सर्व बंद स्ट्रीट लाईट तातडीने सुरू करावेत, अन्यथा नागरिकांच्या रोषाला प्रशासनालाच सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
यासोबतच, स्ट्रीट लाईटसाठी एकच अधिकृत तक्रार क्रमांक, एकसंध तक्रार निवारण प्रणाली आणि निश्चित कालमर्यादेत कार्यवाही करणारी जबाबदार यंत्रणा तातडीने कार्यान्वित करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/HMA5zhKgkFb0dM17DmmjRb
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.









