जळगाव | प्रतिनिधी : शहरातील राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात भाजीपाला विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या मंगला अर्जुन माळी (वय ५५, रा. ज्ञानदेव नगर) यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात त्यांचा मुलगा भरत माळी (वय २९) किरकोळ जखमी झाला. अपघातानंतर टँकर चालकाने घटनास्थळावरून पलायन करण्याचा प्रयत्न केला; मात्र सतर्क नागरिकांनी पाठलाग करून आकाशवाणी चौकात त्याला पकडत एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगला माळी या नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी मुलगा भरत याच्यासोबत दुचाकीवरून पिंप्राळा येथील आठवडे बाजारात भाजीपाला विक्रीसाठी निघाल्या होत्या. शहरातील राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या टँकरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका प्रचंड होता की मायलेक रस्त्यावर फेकले गेले. मंगला माळी रस्त्यावर पडताच टँकरचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. भरत माळी यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
नागरिकांच्या धाडसामुळे चालक जेरबंद
अपघातानंतर टँकर चालकाने वाहन न थांबवता पाळधीच्या दिशेने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, अपघात पाहिलेल्या नागरिकांनी प्रसंगावधान राखत तत्काळ टँकरचा पाठलाग केला. काही अंतरावर आकाशवाणी चौकातील महादेव हॉस्पिटलसमोर टँकर अडवून चालकाला पकडण्यात आले. त्यानंतर चालकाला एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. नागरिकांच्या तत्परतेमुळे चालकाचा पलायनाचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला.
रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठविण्यात आला. रुग्णालयात मंगला माळी यांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.
मंगला माळी या अनेक वर्षांपासून भाजीपाला विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून ज्ञानदेव नगर परिसरात शोककळा पसरली आहे.
भरधाव वाहनांवर कठोर कारवाईची मागणी
या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी राष्ट्रीय महामार्गावरून धावणाऱ्या भरधाव अवजड वाहनांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली आहे. वेगमर्यादेची प्रभावी अंमलबजावणी, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन आणि बेदरकार वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली. निष्पाप कष्टकरी महिलेचा निष्काळजी वाहनचालकामुळे झालेला मृत्यू अत्यंत दुर्दैवी असून दोषी चालकावर कठोर कायदेशीर कारवाई करून त्याला कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/HMA5zhKgkFb0dM17DmmjRb
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.










