मुंबईतील मालाड परिसरातील ‘ब्लिंक कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड’ (Blinkit) च्या गोदामावर तुकाराम मुंढेंच्या अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई करत गोदामाचा अन्न परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित केला आहे.
FDA च्या अधिकाऱ्यांनी या गोदामाची अचानक पाहणी केली असता, अन्न सुरक्षेचे आणि स्वच्छतेचे धिंडवडे निघाल्याचे चित्र समोर आले. FDA अधिकाऱ्यांनी केलेल्या सखोल तपासणीदरम्यान गोदामामध्ये खालील अत्यंत गंभीर बाबी आणि नियमभंग आढळून आले.भाजीपाला आणि फळांच्या साठवणुकीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झुरळांचा वावर आढळला. यामुळे अन्नपदार्थ दूषित होऊन ग्राहकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. कीटक व उंदीर नियंत्रणासाठी (Pest Control) कोणतीही प्रभावी यंत्रणा तिथे कार्यरत नव्हती. गोदामात अत्यंत अस्वच्छ परिस्थिती होती. थेट जमिनीवर अन्नपदार्थ ठेवण्यात आले होते, तसेच कोल्ड स्टोरेजची नियमित स्वच्छता केली जात नव्हती. कोल्ड रूमसह गोदामाच्या विविध भागांत मुदतबाह्य झालेले आणि खराब झालेले पॅकबंद अन्नपदार्थ साठवून ठेवण्यात आले होते.
अन्न सुरक्षेसाठी अनिवार्य असलेल्या FIFO (First In, First Out) आणि FEFO (First Expired, First Out) या मानक पद्धतींचा वापर साठवणुकीदरम्यान केला जात नव्हता. गोदामात अन्नपदार्थांची हाताळणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आवश्यक वैद्यकीय तपासणी (Medical Examination) करण्यात आली नव्हती, तसेच त्याबाबतची कोणतीही नोंद उपलब्ध नव्हती. कचऱ्याची योग्य विल्हेवाट, दैनंदिन स्वच्छता आणि देखभालीमध्ये अनेक त्रुटी निदर्शनास आल्या.FDA ची कडक कारवाई आणि इशारा
या सर्व गंभीर बाबींची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, 2006 (Food Safety and Standards Act, 2006) तसेच संबंधित नियमांनुसार तात्काळ कारवाई केली आहे. परवाना निलंबित करण्यात आल्यामुळे या गोदामातून कोणत्याही प्रकारच्या अन्नपदार्थांची विक्री, पुरवठा किंवा वितरण करण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे. निलंबन कालावधीत जर या गोदामातून अनधिकृतपणे व्यवसाय अथवा साठा वितरण सुरू असल्याचे आढळल्यास, संबंधित व्यवस्थापनावर कायद्यानुसार कठोर गुन्हेगारी स्वरूपाची कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा FDA ने दिला आहे.
खाद्य आस्थापनांविरोधात धडक कारवाई
नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत यासाठी नियमबाह्य काम करणाऱ्या खाद्य आस्थापनांविरोधात अशीच धडक कारवाई पुढेही सुरू राहील, असे FDA प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











