पारंपरिक कानबाई उत्सवाला आजपासून सुरुवात; माहेरवाशिणींसह भाविकांमध्ये उत्साह
खान्देशच्या अहिराणी संस्कृतीचे श्रद्धास्थान असलेल्या कानबाई मातेची आज उत्साहात स्थापना; सोमवारी विसर्जन — नवसपूर्तीसाठी भाविकांची श्रद्धा
जळगाव : खान्देशच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेशी अतूट नाते असलेल्या पारंपरिक कानबाई उत्सवाला रविवार, २३ ऑगस्टपासून सुरुवात झाली. श्रावणातील शुक्ल पक्षात साजऱ्या होणाऱ्या या उत्सवात रविवारी दुपारी विविध ठिकाणी कानबाई मातेची विधिवत स्थापना करण्यात आली. यामुळे माहेरवाशिणींसह भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी, २४ ऑगस्ट रोजी कानबाई मातेचे विसर्जन करण्यात येणार आहे.
कानबाई ही खान्देशातील प्रमुख दैवतांपैकी एक मानली जाते. महाराष्ट्रातील इतर भागांच्या तुलनेत खान्देशात या उत्सवाला विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. नवसाला पावणारी देवता अशी कानबाई मातेची श्रद्धा असल्याने नवसपूर्ती झाल्यानंतर अनेक कुटुंबांकडून कानबाईची प्रतिष्ठापना केली जाते. त्यामुळे हा उत्सव केवळ धार्मिक विधी न राहता कुटुंबीय, नातेवाईक आणि भाऊबंदकीला एकत्र आणणारा भावनिक सोहळा ठरतो.
परंपरेला आधुनिकतेची जोड
पूर्वी गावात मानाप्रमाणे एक-दोन ठिकाणीच कानबाईची प्रतिष्ठापना केली जात असे. त्या वेळी विविध समाजांतील भाऊबंदकीचे सदस्य एकत्र येऊन हा उत्सव साजरा करीत. कालांतराने सामाजिक रचना बदलली, संयुक्त कुटुंबपद्धती कमी झाली आणि भाऊबंदकीतील गट-तटही वाढले. त्यामुळे उत्सवाच्या स्वरूपात बदल झाला असला, तरी कानबाई मातेवरील श्रद्धा आणि परंपरेचे महत्त्व आजही कायम आहे.
कानबाईच्या प्रतिष्ठापनेवेळी पूर्वी पितळी किंवा लाकडी मुखवटा असलेली मूर्ती अथवा श्रीफळाची पूजा करून त्याला ‘कानबाई’ असे संबोधले जात असे. हिरवे वस्त्र परिधान करून आभूषणांनी सजविल्यानंतर मातेची स्थापना केली जाते. या उत्सवातील महत्त्वाचा भाग म्हणजे ‘रोट’. कुटुंबातील आणि भाऊबंदकीतील सदस्य एकत्र येऊन रोट तयार करतात. मात्र, घरात सुतक असल्यास किंवा बाळाचा जन्म झाल्यास काही कुटुंबांमध्ये रोट करण्याची परंपरा टाळली जाते.
रात्रभर जागरण, फुगड्या आणि अहिराणी गाण्यांची रंगत
कानबाईची स्थापना झाल्यानंतर रात्री परिसरातील महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक आणि बालकांसह आबालवृद्ध एकत्र येतात. रात्रभर स्वरचित अहिराणी गाणी, पारंपरिक गीते, फुगड्या, थट्टा-मस्करी आणि जागरणातून उत्सवाला रंगत येते. विशेषतः माहेरवाशिणींच्या उपस्थितीमुळे या उत्सवाला भावनिक आणि कौटुंबिक स्वरूप प्राप्त होते.
दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच विसर्जनाची तयारी सुरू होते. अनेक ठिकाणी कुटुंबीय आणि भाविक सामूहिकरीत्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात. पारंपरिक गीते आणि उत्साहपूर्ण वातावरणात कानबाई मातेचा निरोप घेतला जातो.
अहिराणी संस्कृतीचे श्रद्धास्थान
कानबाई उत्सव हा खान्देशातील अहिराणी संस्कृतीचा महत्त्वाचा भाग मानला जातो. नागपंचमीनंतर येणाऱ्या रविवारी अनेक कुटुंबांमध्ये कानबाईची स्थापना करण्याची परंपरा आहे. काही ठिकाणी घरात शुभ घटना घडल्यास, तर काही कुटुंबे नवस पूर्ण झाल्यानंतर मातेची स्थापना करतात.
विशेषतः अपत्यप्राप्तीसाठी नवस करणाऱ्या महिलांमध्ये कानबाई मातेबद्दल मोठी श्रद्धा असल्याचे दिसून येते. नवस पूर्ण झाल्यानंतर कानबाईची प्रतिष्ठापना करून कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत उत्सव साजरा केला जातो.
कानबाईच्या परंपरेत काळानुसार काही सामाजिक बदलही झाले आहेत. चैत्र-वैशाख महिन्यात कानबाईसमोर सामूहिक विवाहाची सुधारणावादी परंपरा काही भागांत रुजली असून आजही अनेक गावांमध्ये सामुदायिक विवाहांचे आयोजन केले जाते.
धार्मिक श्रद्धा, कौटुंबिक एकोपा, भाऊबंदकीचे नाते आणि अहिराणी लोकसंस्कृती यांचा सुंदर संगम असलेला कानबाई उत्सव त्यामुळे खान्देशच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग ठरला आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/HMA5zhKgkFb0dM17DmmjRb
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.










