चहावाल्याला केलं चेअरमन, तर शेतात उभारली इमारत; बोगस मेडिकल कॉलेजचा नाट्यमयरित्या पर्दाफाश ; ‘या’ कोर्सेसाठी उकळले पैसे
उत्तर प्रदेशातील बोगस वैद्यकीय महाविद्यालयाचा पर्दाफाश झाला आहे. एका अपहरण प्रकरणाचा शोध घेत असताना या वैद्यकीय महाविद्यालयाची माहिती मिळाली.
धक्कादायक म्हणजे हे अपहरणाचं प्रकरणही बनावटच होतं, हेही कालांतराने स्पष्ट झालं. एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभेल असा हा प्रकार उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातून समोर आला आहे.
गेल्या बुधवारी (१६ सप्टेंबर), राम सेवक नावाच्या व्यक्तीने मारहरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती, की त्याचा भाऊ सत्येंद्र कुमार (जो बीएस मेडिकल कॉलेज आणि युनिव्हर्सिटी चालवतो) याचे तीन तरुणांनी अपहरण केले आहे आणि २ लाख रुपयांची खंडणी मागत आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करून सत्येंद्रच्या मोबाईलचे लोकेशन ट्रेस केले. लोकेशननुसार तो आग्र्यात असल्याचं समजलं. त्यानुसार पोलीस आग्र्यात पोहोचले आणि त्याला शोधून काढलं. मात्र, पोलिसांनी जेव्हा तीन आरोपी तरुणांची चौकशी सुरू केली, तेव्हा हे अपहरणाचं प्रकरण नसून काही वेगळाच प्रकार असल्याचं समोर आलं. त्या तीन तरुणांनी सांगितलं की त्यांनी सत्येंद्र कुमारच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता आणि त्यांचा प्रवेश रद्द झाल्यामुळे ते फीचे पैसे परत मागत होते.
तरुणांच्या म्हणण्यानुसार, सत्येंद्रने त्यांना आग्र्याला एका बँकेत पैसे ठेवल्याचे सांगून सोबत येण्यास सांगितलं होते. यानंतर पोलिसांनी सत्येंद्रची कॉलेजबाबत चौकशी सुरू केली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं, “सुरुवातीला सत्येंद्रने सांगितलं की हे कॉलेज हापूरमधील एका संस्थेशी संलग्न आहे, परंतु ही माहिती खोटी निघाली. नंतर त्याने दुसऱ्या संस्थेचं नाव घेतलं, तेही खोटं निघालं. यामुळे विद्यापीठाच्या वैधतेवर संशय वाढला.” पुढील चौकशीत सत्येंद्र कुमारवर आधीच चार गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. विद्यार्थ्यांकडून घेतलेले पैसे परत करण्यासाठी दबाव वाढल्याने त्याने स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचला होता.

शेतातील कॅम्पस आणि बनावट कागदपत्रे
पोलीस अधिकारी म्हणाले, “जेव्हा पोलिसांचं पथक मेहमूदपूर नगरिया गावात बीएस मेडिकल कॉलेज आणि युनिव्हर्सिटीची पाहणी करण्यासाठी गेले, तेव्हा हायवेजवळील शेतजमिनीवर एक पडकी एकमजली इमारत पाहून आम्हाला धक्का बसला. पांढऱ्या रंगाच्या त्या इमारतीवर बीएस मेडिकल कॉलेजचा बॅनर होता. त्यात १० खोल्या होत्या, ज्यातील काही सुसज्ज होत्या, पण तिथे एकही स्वच्छतागृह नव्हतं. तिथून बनावट गुणपत्रिका, परीक्षांचे रेकॉर्ड, विद्यार्थ्यांची ओळखपत्रे, प्रवेश अर्ज, हजेरी पट, विविध कोर्सेसच्या फाईल्स, कॉलेजचा शिक्का आणि इतर शैक्षणिक साहित्य जप्त करण्यात आलं आहे.”
तपासानुसार, हे बनावट वैद्यकीय महाविद्यालय २०२२ पासून सुरू होतं आणि DPharma, BPharma, BSc Nursing, DMLT, BMLT, BAMS, GNM आणि ANM यांसारख्या विविध कोर्सेसचे आमिष दाखवून विद्यार्थ्यांकडून पैसे उकळत होते. विद्यार्थ्यांना कोर्सेसनुसार वेगवेगळी फी आकारली जायची आणि नंतर बनावट शैक्षणिक कागदपत्रे दिली जायची.
एटाचे सर्कल ऑफिसर संकल्प दी कुशवाह यांनी सांगितलं की, प्राथमिक तपासात ५४ विद्यार्थ्यांच्या नावनोंदणीचे दस्तऐवज आढळले आहेत, जरी कोणत्याही विद्यार्थ्याने प्रत्यक्षात तिथे कधीही क्लास अटेंड केला नव्हता. याप्रकरणी सत्येंद्र कुमारसह आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एटा, कासगंज, अलीगढ, आग्रा आणि हाथरस येथील विद्यार्थ्यांना प्रवेशाचे आमिष दाखवून फसवण्यात आले होते.
अशिक्षित चहा विक्रेता बनला ‘चेअरमन’
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, कॉलेजच्या रेकॉर्डवर आणि बॅनरवर ज्या व्यक्तीचे नाव ‘चेअरमन’ म्हणून होते, तो एक ४३ वर्षांचा अशिक्षित चहा विक्रेता आहे, ज्याचे नाव भगवान दास सिंग बघेल आहे. बघेललाही अटक करण्यात आली असून, तो कॉलेजच्या इमारतीसमोरील रस्त्यावर चहाची टपरी चालवतो. बघेलने आपण निर्दोष असल्याचा दावा केला आणि आपल्याला चेअरमन केल्याचे माहीत नसल्याचं सांगितलं. मात्र, पोलिसांनी सांगितलं की तो सत्येंद्र आणि इतरांनी आणलेल्या कॉलेजच्या कागदपत्रांवर नियमित स्वाक्षऱ्या करायचा.
अटक करण्यात आलेल्या इतर तिघांमध्ये नरेंद्र उर्फ पप्पू (३८), मोहम्मद शरीफ कुरेशी (७२) आणि कासगंजचा गौरव अग्रवाल (४०) यांचा समावेश आहे. पोलीस सूत्रांनुसार, कुरेशी हा एक बोगस डॉक्टर आहे, ज्याला फॅकल्टी मेंबर (प्राध्यापक) म्हणून नाटक करण्यासाठी दरमहा ३ हजार रुपये मिळायचे. गौरव अग्रवाल हा एका निवृत्त मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याचा मुलगा आहे, तर नरेंद्रवर आधीच दोन गुन्हे दाखल आहेत. सत्येंद्र कुमारने हे बनावट इन्स्टिट्यूट सुरू केले होते आणि नंतर इतर लोक त्याला जोडले गेले. सत्येंद्र स्वतःला विद्यापीठाचा कुलगुरू (व्हॉईस-चांसलर) म्हणवून घ्यायचा, तर बाकीचे जण बनावट प्रवेश आणि बनावट कागदपत्रे तयार करण्याचं काम करायचे.
जप्त केलेले साहित्य
पोलिसांनी घटनास्थळावरून १ लॅपटॉप, वेगवेगळ्या बँकांचे ४ बनावट धनादेश, १६ बनावट विद्यार्थी ओळखपत्रे, बनावट प्रवेश अर्ज आणि हजेरी पत्रके, बनावट फी पावत्या, उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका, १ बनावट शिक्का, विद्यापीठाचा बनावट कोड असलेले पॅम्पलेट्स, लेटरहेड्स आणि बनावट गुणपत्रिका जप्त केल्या आहेत.
“बनावट संस्था चालवल्याप्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे”, अशी माहिती एटाचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक (ASP) श्वेताभ पांडे यांनी दिली.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.









