कसाबच्या भूमिकेमुळे सर्वत्र चर्चेत असलेल्या ललित प्रभाकरचं खरं आडनाव माहितीये का ? १३ वर्षांपूर्वी नशीब पालटलं
मराठी मनोरंजन विश्वाचा ‘चॉकलेट बॉय’ सर्वांचा लाडका अभिनेता ललित प्रभाकर सध्या ‘प्रहार’ सिनेमामुळे चर्चेत आहे. ललितने या चित्रपटात दहशतवादी अजमल कसाबची भूमिका साकारली आहे.
सध्या सर्वत्र ललितच्या अभिनयाचं भरभरून कौतुक केलं जात आहे. ‘प्रहार’ सिनेमा ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर आधारित असून, २६/११ चा हल्ला, कसाबने ऐनवेळी कशाप्रकारे आपलं स्टेटमेंट बदललं, उज्जवल निकम यांनी दिलेला लढा, त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी अशी सविस्तर गोष्ट या सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळतेय.

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सपासून ते चित्रपट समीक्षकांपर्यंत सध्या सर्वत्र ललितचं कौतुक करण्यात येत आहे. आज देशभरात चर्चेत असणारा ललित प्रभाकर मराठी कलाविश्वातील ‘वन ऑफ द फाइनेस्ट’ अभिनेता आहे असं त्याचे चाहते अभिमानाने सांगत आहेत. १३ वर्षांपूर्वीच्या ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेमुळे त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली होती. त्याने साकारलेलं आदित्यचं पात्र घराघरांत गाजलं आणि टेलिव्हिजनवर मिळालेल्या यशानंतर ललित मोठ्या पडद्याकडे वळला.
‘चि. व चिं.सौ का’ या परेश मोकाशी दिग्दर्शित चित्रपटाद्वारे ललितने मराठी सिनेविश्वात पाऊल ठेवलं. त्यानंतर ‘हंपी’ सिनेमा केला आणि ‘आनंदी गोपाळ’मध्ये वेगळ्या धाटणीची भूमिका साकारत सर्वांची मनं जिंकून घेतली. गेल्या काही वर्षात ललित ‘स्माईल प्लीज’, ‘झोंबिवली’ , ‘मीडियम स्पायसी’, ‘सनी’, ‘कलरफूल’ , ‘आरपार’, ‘प्रेमाची गोष्ट २’, ‘सुपर डुपर’ अशा बऱ्याच सिनेमांमध्ये झळकला आणि आता ‘प्रहार’मधून त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पण, तुम्हाला माहितीये का ललित आपल्या नावापुढे आडनाव न लावता त्याच्या वडिलांचं प्रभाकर असं नाव लागतो.
ललितचं पूर्ण नाव ललित प्रभाकर भदाणे असं आहे. भदाणे हे त्याचं खरं आडनाव असून तो खान्देशी आहे. धुळ्यातील सामोडे हे त्याचं गाव. त्याने कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी मिळवली आहे. यानंतर रंगभूमीपासून त्याचा प्रवास सुरू झाला. पण, खऱ्या अर्थाने त्याला ओळख मिळाली ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेमुळे!
‘प्रहार’मधील भूमिका कशी मिळाली?

“मला या ऑडिशनसाठी फोन आला होता…मग ऑडिशनची संपूर्ण प्रकिया पार पडली. मी अजमल कसाबची भूमिका साकारू शकेन असा विश्वास या टीमने माझ्यावर दाखवला आणि मला ही संधी मिळाली. अभिनय करताना माझी प्रतिमा एका विशिष्ट साच्यात अडकून राहणार नाही, यासाठी मी नेहमीच वेगवेगळ्या भूमिका साकारण्याचा प्रयत्न करतो. प्रेक्षकांनी माझ्या अभिनयातील विविध पैलू पाहावेत अशी माझी कायम इच्छा असते. त्यामुळे मी मुद्दाम अशा सिनेमांची, अशाप्रकारच्या भूमिकांची निवड करतो, ज्या भूमिका माझी आधीची प्रतिमा मोडून काढतात आणि प्रेक्षकांना कायम आश्चर्यचकीत करतात.” असं ललितने इ-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.












