९ कोटी ४० लाखांचा गांजा जप्त; मात्र आंतरराष्ट्रीय तस्करीचे मुख्य सूत्रधार अद्याप मोकाट!

नंदुरबार : सातपुड्याच्या पर्वतरांगा आणि घनदाट वनक्षेत्रात बेकायदेशीर गांजा लागवड आणि तस्करीचे जाळे विस्तारत असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने केलेल्या धडक कारवायांमध्ये यावर्षी तब्बल ९ कोटी ४० लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला असून, गांजा लागवड, विक्री आणि तस्करीप्रकरणी ५६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, कोट्यवधींच्या गांजा तस्करीमागील मुख्य सूत्रधार आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विक्रीचे जाळे चालविणारी टोळी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नसल्याचा प्रश्न उपस्थित होत आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव, अक्कलकुवा, तळोदा, मोलगी, शहादा आणि नवापूर परिसरातील दुर्गम भागांमध्ये गांजाची लागवड आणि विक्री होत असल्याचे समोर आले आहे. सातपुड्याच्या डोंगररांगा, दुर्गम भौगोलिक परिस्थिती आणि घनदाट वनक्षेत्राचा फायदा घेत तस्करांकडून गांजाची शेती केली जात असल्याचे चित्र आहे. स्थानिक आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन या अवैध व्यवसायाचा विस्तार केला जात असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
स्थानिकांमागे नेमके कोणाचे जाळे?
या संपूर्ण प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे दुर्गम आदिवासी भागात गांजाच्या लागवडीचे तंत्र, त्याचे उत्पादन आणि विक्रीची साखळी स्थानिकांपर्यंत पोहोचविण्यामागे नेमकी कोणती यंत्रणा कार्यरत आहे? गांजाची लागवड करण्यासाठी प्रशिक्षण, बियाणे, आर्थिक मदत आणि पुढील विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देणारे सूत्रधार कोण आहेत, याचा सखोल तपास होणे आवश्यक आहे.
पोलीस कारवायांमध्ये अनेकदा स्थानिक मजूर किंवा अल्पभूधारक शेतकरी पोलिसांच्या हाती लागत असल्याचे चित्र दिसते. मात्र, या अवैध व्यवसायातून मोठा आर्थिक फायदा मिळविणारे, मालाची वाहतूक करणारे आणि व्यापक बाजारपेठेत विक्रीची व्यवस्था करणारे मुख्य सूत्रधार अद्याप समोर आले आहेत का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
केवळ गांजाची शेती उद्ध्वस्त करून प्रश्न सुटणार का?
पोलिसांनी केलेल्या कारवायांमुळे गांजाची लागवड आणि तस्करीविरोधात कारवाई सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, केवळ गांजाची शेती उद्ध्वस्त करणे किंवा स्थानिक पातळीवरील आरोपींवर गुन्हे दाखल करणे पुरेसे ठरणार नाही. या अवैध व्यवसायाची आर्थिक साखळी, पुरवठादार, वाहतूकदार, खरेदीदार आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी असलेले संभाव्य संबंध तपासणे गरजेचे आहे.
गांजा तस्करीचे संपूर्ण जाळे उघड करून त्यामागील आर्थिक सूत्रधारांपर्यंत पोहोचणे हे पोलीस आणि महसूल प्रशासनापुढील महत्त्वाचे आव्हान ठरत आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास केवळ स्थानिक पातळीवर मर्यादित न ठेवता तस्करीच्या संपूर्ण साखळीचा शोध घेण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.
तस्करांची गय केली जाणार नाही : पोलीस अधीक्षक अश्विनी सानप
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून गांजा लागवड आणि तस्करीविरोधात कठोर कारवाई करण्यात येत आहे. यावर्षी धडक मोहिमेद्वारे ९ कोटी रुपयांहून अधिक किमतीचा गांजा उद्ध्वस्त करण्यात आला असून, ५६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अमली पदार्थविरोधी कारवाईसाठी पोलिसांचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असून, या गुन्हेगारीत सहभागी असलेल्या कोणालाही गय केली जाणार नाही, अशी प्रतिक्रिया नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी दिली.
आता प्रश्न केवळ गांजा जप्तीचा नाही, तर या अवैध व्यवसायामागील संपूर्ण यंत्रणा उघड करण्याचा आहे. कोट्यवधींचा गांजा जप्त होत असताना या व्यवसायाचे खरे सूत्रधार कधी पोलिसांच्या जाळ्यात अडकणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











