50 लाखांचा विमा हडपण्याचा डाव फसला ; जळगावच्या ‘त्या’ चार पोलिसांवर चालणार खटला , गृहखात्याची मंजुरी

जळगाव जिल्ह्यातील चार पोलिस कर्मचाऱ्यांविरुद्ध न्यायालयात खटला चालविण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. पोलिस दलात याप्रकरणाची चर्चा आहे.
आजारपणामुळे मृत्यू झालेल्या व्यतीचा मृत्यू हा अपघाती मृत्यू असल्याचे भासवून तब्बल ५० लाख रुपयांची विमा रक्कम हडपण्याचा कट उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या कटात नातेवाईक, वैद्यकीय अधिकाऱ्यांसह चार पोलिसांचा समावेश आढळून आला आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
दरम्यान या गंभीर प्रकरणात जळगाव जिल्ह्यातील चार पोलिस कर्मचाऱ्यांविरुद्ध न्यायालयात खटला चालविण्यास गृहखात्याने मंजुरी दिली आहे. या प्रकरणी पोलिस कर्मचारी रवींद्र बत्तीसे, सचिन निकम, सुनील निकम आणि महेंद्र पाटील यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करून खटला चालविला जाणार जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील एका व्यक्तीचा २३ फेब्रुवारी २०२४ रोजी आजारपणामुळे मृत्यू झाला. मात्र, त्यानंतर मृताच्या पत्नीने, भावाने आणि काही एजंटांनी मिळून विम्याची ५० लाख रुपयांची मोठी रक्कम लाटण्याच्या उद्देशाने संबंधित व्यक्तीचा मृत्यू अपघातात झाल्याचा बनाव रचला. चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या अपघातात संबधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा बनाव रचण्यात आला.
याप्रकरणात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी खोटा वैद्यकीय अहवाल देत अपघाती मृत्यू दाखवला. तसेच मेहुणबारे, चाळीसगाव, पाचोरा पोलिस ठाण्यातील चार पोलिस कर्मचाऱ्यांनी या खोट्या अपघाताचा पंचनामा आणि इतर कागदपत्रे तयार करून मदत केली होती.
दरम्यान विमा कंपनीचे अधिकारी मयताच्या घरी पडताळणीसाठी गेले असता भिंतीवर लावलेल्या मयताच्या फोटोवर मृत्यूची खरी तारीख (२३ फेब्रुवारी २०२४) दिसली. तेथून बनाव उघड झाला व या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन तपासात संशयितांचा ५० लाखांचा विमा हडपण्याचा हा मोठा डाव अखेर फसला.
विमा रक्कम हडपण्यासाठी बनावट नोंद कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्या प्रकरणात जळगावच्या चारही पोलीस कर्मचाऱ्यांवर न्यायालयात अभियोग दाखल करण्यास गृहखात्याने मंजुरी दिली आहे. अटकेनंतर चारही पोलिसांची कारागृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











