
नवी दिल्ली : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई, शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणि स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तरदायित्व निश्चित करण्याच्या मागण्यांसाठी 26 दिवसांपासून उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी अखेर आपले उपोषण मागे घेतले. मध्यरात्री केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. उपोषण संपविल्याची माहिती स्वतः सोनम वांगचुक यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) वर पोस्ट करून दिली.

सोनम वांगचुक यांनी 28 जून रोजी अनिश्चितकालीन उपोषण सुरू केले होते. नीटसह विविध स्पर्धा परीक्षांमध्ये झालेल्या कथित पेपरफुटीच्या घटनांविरोधात देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले होते. या माध्यमातून त्यांनी शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता, उत्तरदायित्व निश्चित करणे, दोषींवर कठोर कारवाई करणे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस यंत्रणा उभारण्याची मागणी केली होती.
दीर्घकाळ उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावू लागली होती. उपोषणाच्या 21 व्या दिवशी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि न्यायालयाच्या निर्देशानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. सुरुवातीला रुग्णालयात जाण्यास त्यांनी आक्षेप घेतला होता. मात्र उपचार सुरू असतानाच केंद्र सरकारच्या प्रतिनिधींनी त्यांची भेट घेतली आणि मागण्यांवर चर्चा केली.

या चर्चेदरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी सरकारतर्फे काही महत्त्वाची आश्वासने दिली. त्यानुसार, 20 जुलै रोजी संसदेवर शांततेने मोर्चा काढणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणताही गुन्हा दाखल केला जाणार नाही. तसेच नीट पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील आवश्यक सुधारणांवर संसदेत चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय, नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याच्या मागणीचाही सरकार सकारात्मक विचार करेल, असे आश्वासन देण्यात आले.
या आश्वासनांनंतर सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांनी आपल्या संदेशात विद्यार्थ्यांच्या लढ्याला पाठिंबा कायम राहील आणि शिक्षण व्यवस्थेत सुधारणा होणे हीच या आंदोलनाची खरी जिंक असे नमूद केले.
दरम्यान, सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले असले तरी आंदोलन अद्याप पूर्णपणे थांबलेले नाही. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी वांगचुक यांच्या निर्णयाचे स्वागत करत त्यांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “26 दिवसांच्या कठोर उपोषणानंतर त्यांनी घेतलेला निर्णय दिलासादायक आहे. त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून देशाच्या विवेकाला जागृत करण्याचे काम केले,” असे ते म्हणाले.

मात्र, जंतर-मंतर येथे सुरू असलेले आंदोलन सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे सोनम वांगचुक यांचे उपोषण संपले असले तरी नीट पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांबाबतचा संघर्ष पुढील काळातही सुरू राहण्याची चिन्हे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











