नाशिक | प्रतिनिधी : नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या रात्रभर कोसळलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी नदीने धोकादायक पातळी गाठली असून रामकुंड परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुराच्या पाण्याने ऐतिहासिक रामकुंड परिसर जलमय झाला असून अनेक लहान-मोठी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. गोदाघाटावरील प्रसिद्ध दुतोंड्या मारुतीच्या मूर्तीच्या छातीपर्यंत पाणी पोहोचल्याने पुराच्या तीव्रतेची कल्पना येत आहे.
नाशिक आणि परिसरात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. शुक्रवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसानंतर शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले, तर रस्त्यांवरून पाण्याचे प्रवाह वाहू लागले. याचा वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम झाला असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

रामकुंड परिसरात पूरसदृश परिस्थिती
सतत वाढणाऱ्या पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. रामकुंड परिसरात पुराचे पाणी शिरल्याने घाटावरील अनेक प्राचीन मंदिरे पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. दुतोंड्या मारुतीच्या मूर्तीच्या छातीपर्यंत पाणी पोहोचल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गोदाघाटावरील दुकाने, टपऱ्या आणि व्यावसायिक आस्थापनांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या असून नदीकाठच्या परिसरात प्रवेश करण्यासही निर्बंध घालण्यात आले आहेत.
रात्रभर मंदिरात अडकलेल्या नेपाळी पर्यटकाची थरारक सुटका
पूराच्या पाण्याचा वेग अचानक वाढल्याने गांधी ज्योत परिसरातील एका मंदिरात नेपाळमधील एक तरुण पर्यटक अडकून पडला. पाण्याची पातळी आणि प्रवाह इतका वाढला की त्याला बाहेर पडणे अशक्य झाले. अख्खी रात्र त्याने मंदिरातच जीव मुठीत धरून काढली.
शनिवारी सकाळी ही माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस, जीवरक्षक पथक आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बचाव पथकाने दोरांच्या सहाय्याने आणि विशेष सुरक्षेची खबरदारी घेत त्या पर्यटकाला सुखरूप बाहेर काढले. या यशस्वी बचाव मोहिमेमुळे उपस्थित नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. संबंधित तरुण मूळचा नेपाळचा असून तो गेल्या काही महिन्यांपासून नाशिकमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे.

धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग
जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पाऊस सुरू असल्याने जलसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने विविध धरणांमधून नियंत्रित स्वरूपात पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.
गंगापूर धरण – ३,१६५ क्यूसेक
दारणा धरण – २,६४८ क्यूसेक
पालखेड धरण – १०,३३२ क्यूसेक
नांदूर मध्यमेश्वर बंधारा – १३,४०७ क्यूसेक
याशिवाय पुनेगाव, भावली आणि कडवा धरणांतूनही पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे गोदावरी आणि दारणा नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
पूरस्थिती लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने नागरिकांना नदीपात्र, घाट आणि पुलांवर गर्दी करू नये, पुराच्या पाण्यात उतरू नये तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन केले आहे. नदीकाठच्या गावांवर प्रशासनाचे विशेष लक्ष असून परिस्थितीवर सातत्याने नजर ठेवण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या असून कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी खबरदारी घेतली जात आहे.

सध्या नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून पुढील काही तासांतही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/HMA5zhKgkFb0dM17DmmjRb
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.










