सुप्रसिद्ध उद्योजक तथा विको लॅबोरेटरीजचे संचालक सुमंत पेंढारकर यांचे निधन
मुंबई : आयुर्वेदिक उत्पादनांच्या क्षेत्रात देश-विदेशात नावाजलेल्या Vicco Products (Bombay) Pvt. Ltd. चे संचालक सुमंत केशव पेंढारकर यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे उद्योगविश्वात तसेच सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सुमंत पेंढारकर यांनी १९८४ पासून विको प्रॉडक्ट्सच्या संचालकपदाची धुरा सांभाळली. तब्बल चार दशकांहून अधिक काळ त्यांनी कंपनीच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. पेंढारकर कुटुंब हे विकोचे संस्थापक कुटुंब असून, कंपनीची स्थापना १९५२ मध्ये स्वर्गीय केशवराव पेंढारकर यांनी केली होती. सुमंत पेंढारकर हे या उद्योगसमूहाच्या दुसऱ्या पिढीतील संचालक होते.
त्यांच्या नेतृत्वाखाली विकोने देशांतर्गत बाजारपेठेबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोठी भरारी घेतली. आज विकोची आयुर्वेदिक उत्पादने ४० हून अधिक देशांमध्ये निर्यात केली जातात. गुणवत्तेच्या बळावर विकोने भारतीय आयुर्वेदिक उत्पादनांना जागतिक ओळख मिळवून दिली. २०२६ मध्ये विको लॅबोरेटरीजला महाराष्ट्रातील “मोस्ट पॉप्युलर ब्रँड २०२६” हा प्रतिष्ठेचा पुरस्कारही प्राप्त झाला होता.
सुमंत पेंढारकर यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शोक व्यक्त करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. विविध उद्योग, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांनीही त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
आयुर्वेदिक उद्योगाच्या प्रगतीसाठी आणि भारतीय उत्पादनांना जागतिक स्तरावर पोहोचविण्यात महत्त्वपूर्ण योगदान देणारे सुमंत पेंढारकर यांचे कार्य कायम स्मरणात राहील.
स्व. सुमंत पेंढारकर यांना दैनिक मार्केट स्पेशलकडून भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व पेंढारकर कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो, हीच प्रार्थना.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/HMA5zhKgkFb0dM17DmmjRb
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.










