जळगावात कावड यात्रेदरम्यान ट्रकच्या धडकेत ८ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू; संतप्त जमावाने ट्रक पेटवला
जळगाव : श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी कावड यात्रेचा उत्साह सुरू असतानाच जळगाव शहरात एक भीषण दुर्घटना घडली. जळगाव-ममुराबाद रस्त्यावरील प्रजापती नगराजवळ भरधाव ट्रकने धडक दिल्याने आठ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील शनिपेठ परिसरातील गवळीवाडा येथील प्रबल राजू गवळी (वय ८) हा कावड यात्रेदरम्यान देवीच्या मंदिरात दर्शनासाठी गेला होता. दर्शन घेऊन मंदिराबाहेर येत असताना भरधाव ट्रकने त्याला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात प्रबलचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती परिसरात पसरताच नागरिक आणि भाविक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. अपघातामुळे संतप्त झालेल्या जमावाने ट्रकचालकाला मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला.
या घटनेत ट्रकचालकही जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, संतप्त नागरिकांनी मृत बालकाचा मृतदेह रस्त्यावर ठेवून चालकाला घटनास्थळी आणून जमावाच्या ताब्यात देण्याची मागणी केली. पेटलेला ट्रक विझविण्यासही काही काळ जमावाकडून विरोध करण्यात आल्याचे समोर आले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, पोलिसांकडून जमावाची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू होते.
जळगावातील दुर्घटनेप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून, अपघात नेमका कशामुळे झाला आणि ट्रकचालकाची कायदेशीर स्थिती काय आहे, याबाबत तपासानंतर अधिक माहिती समोर येणार आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/HMA5zhKgkFb0dM17DmmjRb
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.










