‘भारत टॅक्सी’ आजपासून पुणेकरांच्या सेवेत! भाडं राहणार ‘फिक्स’ अन् पारदर्शक
पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासासाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुण्यात आता खाजगी टॅक्सी कंपन्यांच्या मनमानी कारभाराला आणि प्रवाशांच्या होणाऱ्या आर्थिक फसवणुकीला सणसणीत आळा बसणार आहे.
कारण पूर्णपणे सहकार तत्त्वावर आधारित असणारी ‘भारत टॅक्सी’ (Bharat Taxi) ही नवीन वाहतूक सेवा आजपासून पुणे शहरात अधिकृतपणे कार्यान्वित होत आहे.
ओला आणि उबरसारख्या खाजगी ॲप-आधारित कंपन्यांकडून सर्ज प्राइसिंगच्या नावाखाली आकारले जाणारे अव्वाच्या सव्वा भाडे आणि चालकांच्या कमाईतून होणारी भरमसाठ कमिशन कपात यामुळे त्रस्त झालेल्या प्रवाशांसाठी हा एक विश्वासार्ह पर्याय ठरणार आहे. लवकरच नागपूर, नाशिक, कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये देखील ही सेवा सरू केली जाणार आहे.
कॅब आणि रिक्षाचालकांची विक्रमी नोंदणी
या नवीन सहकार पॅटर्नवरील प्रवासी वाहतूक व्यवस्थेला पुणे शहरातील चालकांचा प्रचंड मोठा प्रतिसाद लाभला आहे. आतापर्यंत तब्बल 50,000 हून अधिक रिक्षा आणि कॅब चालकांनी या प्लॅटफॉर्मवर आपली नोंदणी पूर्ण केली आहे. ही संपूर्ण यंत्रणा सहकारी पद्धतीने चालवली जाणार असल्यामुळे चालकांच्या हक्कांचे काटेकोरपणे संरक्षण होणार आहे. त्यांच्या मेहनतीच्या कमाईतील जास्तीत जास्त आणि योग्य वाटा थेट चालकांच्या खिशात पडणार आहे. यामुळे स्थानिक चालकांचे आर्थिक सक्षमीकरण होण्यास मोठी मदत मिळणार आहे.
भाडे राहणार ‘फिक्स’ आणि पारदर्शक
प्रवाशांच्या दृष्टीने विचार केल्यास ही सेवा अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. अनेकदा पाऊस, वाहतूक कोंडी किंवा कडक उन्हाच्या वेळी खाजगी कंपन्या प्रवाशांकडून अतिरिक्त भाडे वसूल करतात. मात्र, ‘भारत टॅक्सी’मध्ये हवामानाची कोणतीही परिस्थिती असली, तरी प्रवास भाडे हे पूर्णपणे निश्चित आणि पारदर्शक राहणार आहे. यामुळे प्रवाशांची होणारी आर्थिक लूट थांबणार असून त्यांना परवडणारा प्रवास अनुभवता येईल.
ॲप गुगल प्ले स्टोअरवर
महाराष्ट्र कामगार सभेचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी माध्यमांशी सांगितले की, हा केवळ एक वाहतूक पर्याय नसून वाहतूक क्षेत्रात आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्याचे हे एक ऐतिहासिक पाऊल आहे. प्रवाशांसाठी आणि चालकांसाठी या प्लॅटफॉर्मवर स्वतंत्र ॲप उपलब्ध असून हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर डाउनलोडसाठी उपलब्ध आहे.
महाराष्ट्रातील अन्य शहरांमध्येही विस्ताराची योजना
पुण्यातील सेवेनंतर नागपूर, नाशिक, कोल्हापूर आणि सोलापूर या शहरांमध्येही भारत टॅक्सी सेवा सुरू करण्याची योजना असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात राज्यातील अन्य शहरांमधील प्रवाशांनाही या सेवेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.
वाहतूक क्षेत्रात सहकाराचा नवा प्रयोग
खासगी कंपन्यांच्या स्पर्धेत सहकारी तत्त्वावर आधारित वाहतूक सेवा कितपत प्रभावी ठरते, याकडे आता प्रवासी आणि चालकांचे लक्ष लागले आहे. प्रवाशांना परवडणारे भाडे, चालकांना योग्य मोबदला आणि व्यवहारात पारदर्शकता या तीन बाबींवर भारत टॅक्सीचे यश अवलंबून राहणार आहे. पुण्यातील या प्रयोगाला प्रवाशांचा किती प्रतिसाद मिळतो आणि प्रत्यक्षात भाडेव्यवस्था किती पारदर्शक राहते, हे आगामी काळात स्पष्ट होईल.
अमित शाह यांच्या हस्ते शुभारंभ
या अत्यंत महत्त्वाच्या आणि बहुप्रतिक्षित सेवेचा अधिकृत शुभारंभ सोहळा आज तळेगाव दाभाडे येथील नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कोऑपरेटिव्ह लिमिटेडच्या (NHECL) आवारात मोठ्या उत्साहात पार पडत आहे. देशाचे केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या शुभहस्ते या सेवेचे लोकार्पण केले जाणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री तसेच केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे देखील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या ऐतिहासिक उपक्रमामुळे पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत एक नवा, सकारात्मक आणि क्रांतिकारी बदल पाहायला मिळणार आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











